आचरेकर पर्वाचा अस्त

क्रिकेट प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांचे वयाच्या ७७व्या वर्षी २ जानेवारी २०१९ रोजी निधन झाले. सचिन तेंडुलकरचे गुरू म्हणून ते क्रिकेट विश्वात ओळखले जात. फक्त सचिनच नाही, तर भारतीय क्रिकेटमधली अनेक शिल्पं घडवणारा तो हात आता थांबलाय. त्यांच्या कार्याची थोडक्यात ओळख करून देणारा हा लेख…
Written by: Onkar D

चित्रपट आणि क्रिकेट समीक्षक शिरीष कणेकर यांनी एका लेखात लिहिलंय, ‘नर्गिसने फक्त ‘मदर इंडिया’ हा एकच सिनेमा केला असता, तरीही ती चित्रपटसृष्टीत अजरामर झाली असती, मात्र तिने अनेक उत्तम भूमिका केल्या. रमाकांत आचरेकरांबाबतही हे वाक्य लागू आहे. आचरेकरांनी फक्त सचिन तेंडुलकरला घडवलं असतं, तरीही ते सर्वोत्तम क्रिकेट प्रशिक्षक ठरले असते, मात्र आचरेकर तेवढ्यावरच थांबले नाहीत. त्यांनी क्रिकेटपटूंच्या दोन पिढ्या अगदी शब्दश: घडवल्या.

सडसडीत शरीरयष्टी, भेदक नजर, हाफ शर्ट आणि ‘ज्वेलथीफ’मध्ये देवानंद घालायचा तशी कॅप असा पेहराव असलेल्या रमाकांत आचरेकरांसाठी क्रिकेट हेच सर्वस्व होते. ते प्रथम श्रेणीचा एकच सामना खेळले. त्यांचा बचाव उत्तम होता असे म्हटले जाते. मात्र त्यांची कारकीर्द एका सामन्यानंतर थांबली. उत्तम प्रशिक्षक होण्यासाठी उत्तम खेळाडू असणे आवश्यक असते असे नाही. एखाद्याचे कौशल्य आणि उणीवा अचूक हेरण्याची कला त्याच्याकडे असावी लागते. आचरेकर सर त्याबाबतीत रत्नपारखी होते.

सचिन तेंडुलकरचा एक किस्सा क्रिकेट समीक्षक द्वारकानाथ संझगिरी यांनी सांगितला आहे. ‘सचिनच्या बॅटची ग्रिप  आदर्श फलंदाजाची असावी तशी नाही. त्यामुळे त्याने ती बदलावी असा सल्ला अनेकांनी त्यांना दिला होता. आचरेकर सरांनी या पुस्तकी तज्ञांचा सल्ला ऐकला नाही. त्यांनी सचिनच्या नैसर्गिक शैलीत बदल केला नाही. सचिनने बॅटची ग्रिप बदलली नाही, तर तो कव्हरमध्ये कॅच देऊन हमखास आऊट होईल असा दावा काही ज्येष्ठ खेळाडू करत असत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील २५ वर्षं कव्हर्समध्ये फिल्डर सचिनच्या कॅचची वाट पाहत होते. तो कॅच त्यांच्याकडे २५ वर्षं फिरकलाच नाही. सचिनच्या आधीच्या पिढीतल्या बलविंदर संधूला आचरेकर सरांनी स्विंगवर भर देण्याचा सल्ला दिला होता. १९८३ विश्वचषकाच्या फायनलमध्ये संधूच्या इनस्विंगरवर गॉर्डन ग्रिनिचचा त्रिफळा उडाला. भारतीय संघाला विजेतपदाचे दार संधूनेच उघडून दिलं. पुस्तक हे क्रिकेट प्रशिक्षणाचा आधार आहे, पण ते अंतिम सत्य नाही हे सरांना पक्कं माहीत होतं.

सचिन तेंडुलकर हा आचरेकर सरांचा अर्जुन होता, पण म्हणून त्यांचे अन्य विद्यार्थ्यांवरील लक्ष कधीही कमी झाले नाही. बलविंदर संधू, चंद्रकांत पंडित, लालचंद राजपूत, विनोद कांबळी, प्रवीण आम्रे, अमोल मुजमदार, अजित आगरकर, संजय बांगर, पारस म्हांब्रे, समीर दिघे, रमेश पोवार यासारखे क्रिकेटपटू आचरेकर सरांच्या तालमीत तयार झाले. सचिन तेंडुलकर, विनोद कांबळी आणि प्रवीण आम्रे हे त्यांचे तीन शिष्य एकाचवेळी १९९२चा क्रिकेट विश्वचषक खेळले. आचरेकर सर टीव्हीवर आपल्या शिष्यांचा खेळ पाहतानाचे फोटो अनेकदा प्रसिद्ध झाले. या फोटोत सरांच्या चेहऱ्यावर कौतुकाचे भाव कमी आणि प्रशिक्षकाची करडी नजर जास्त दिसत असे. याच करड्या नजरेने त्यांनी आपल्या शिष्यांचा खेळ आयुष्यभर न्याहाळला. त्यांच्या खेळात सुधारणा व्हावी यासाठी त्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. शतक, द्विशतक किंवा अगदी त्रिशतक झळकावल्यानंतरही त्यांचा शिष्य चुकीच्या पद्धतीने बाद होणे त्यांना नामंजूर होते. अशा चुकीबद्दल ते त्याची कडक शब्दात कानउघडणी करत. बाद होण्यापूर्वी त्याने जमवलेल्या सर्व धावा मग व्यर्थ ठरत. सरांच्या या कडक शिस्तीमध्ये वाढल्यानेच त्यांचे विद्यार्थी पुढे क्रिकेटमधल्या अटीतटीच्या स्पर्धेत तग धरू शकले.

एकदा का विद्यार्थी सरांच्या तालमीत गेला, की तो त्यांचाच होत असे. आचरेकर सरांच्या सल्ल्यामुळेच सचिनच्या आई-वडिलांनी त्याला वांद्र्यातील घरात न ठेवता दादरला ठेवले. आचरेकर सरांच्या सल्ल्यामुळेच राज सिंग डुंगरपूरकर यांनी नियम शिथील करत सचिनला १३व्या वर्षीच आपल्या क्लबच्या संघात घेतले. त्यामुळे सचिनसाठी आधी रणजीचे आणि नंतर १६व्या वर्षीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे दार उघडे झाले.  १० वर्षाच्या सचिनला स्कूटरवर मागे बसवून आचरेकर सर मुंबईतल्या सर्व मैदानांवर फिरत असत. सचिन त्या काळात एकाच दिवशी १५ मॅचही खेळलाय, ते ही त्याच्या दुप्पट वयाच्या मुलांसोबत. दहाव्या वर्षापासून मिळालेल्या या ‘मॅच प्रॅक्टिस’ चा भविष्यात खूप उपयोग झाला असं सचिनने अनेकदा सांगितलं आहे.

आचरेकर सरांसाठी क्रिकेट हेच सर्वस्व होते. ते त्यांच्या भोईवाड्यातील घरात कमी आणि शिवाजी पार्कवरच्या क्रिकेट मैदानावरच जास्त असत. एकदा आचरेकर सरांच्या जवळच्या नातेवाईकाचे निधन झाले होते. त्या दिवशी संध्याकाळी सचिन आणि शिष्य सरांच्या घरी त्यांना भेटायला गेले. त्यावेळी आचरेकर सर घरी नव्हते. ते शिवाजी पार्कवर क्रिकेटचा सराव घेण्यासाठी गेले होते. ‘सर मैदानावर क्रिकेटचा सराव घेत आहेत, जा त्यांच्याबरोबर सराव करा’ असा निरोप या सर्वांना आचरेकर सरांच्या घरात मिळाला.  १९९९च्या विश्वचषकादरम्यान वडिलांच्या वियोगाचे दु:ख विसरून सचिन संघासाठी इंग्लंडमध्ये परतला होता. त्यावेळी संपूर्ण देशाने सचिनबद्दल कृतज्ञता व्यक्त केली होती. सचिनच्या त्या कृतीचे बीज आचरेकर सरांनी काही वर्षांपूर्वी केलेल्या कृतीत दडले होते.

‘सरळ बॅटने खेळा आणि सरळ वागा’ हा कानमंत्र आचरेकर सरांनी आपल्या शिष्यांना दिला होता. विनोद कांबळीचा अपवाद वगळता त्यांचा कोणताही शिष्य क्रिकेटबाह्य कारणांमुळे गाजला नाही. चंद्रकांत पंडित, लालचंद राजपूत आणि संजय बांगर हे त्यांचे शिष्य आता प्रशिक्षक झाले आहेत. विदर्भाला ऐतिहासिक रणजी विजेतपद मिळवून देण्यात चंद्रकांत पंडित यांच्या प्रशिक्षणाचा मोठा वाटा आहे. लालचंद राजपूत यांच्या तालमीत तयार झालेल्या नवोदित अफगाणिस्तान संघाने अल्पावधीतच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये स्वत:चे स्थान निर्माण केले आहे. संजय बांगर हा भारतीय क्रिकेट टीमचा फलंदाजी प्रशिक्षक आहे. इंग्लंडविरुद्ध २०१४ साली झालेल्या मालिकेत सपाटून मार खाल्ल्यानंतर बांगरची फलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली. मागील पाच वर्षांतील भारतीय फलंदाजीच्या यशात बांगरचे मोठे योगदान आहे. आचरेकर सरांचा क्रिकेट प्रशिक्षणाचा वारसाच त्यांचे हे विद्यार्थी पुढे चालवत आहेत.

आज क्रिकेट शिकवणारे अनेक कोचिंग क्लास सुरु झाले आहेत. या क्लासमधील विद्यार्थ्यांची संख्या आणि अत्याधुनिक माहौल यांच्या जोरावर अनेक  ‘क्रिकेट गुरू’ उदयाला आले आहेत. हे सर्व सुरू होण्याच्या कित्येक वर्षं आधी ‘आचरेकर सर’ नावाचे क्रिकेट प्रशिक्षक त्यांच्या शिष्यासाठी घाम गाळत होते. आचरेकर सरांमुळेच क्रिकेट प्रशिक्षणाला ग्लॅमर आले. आता क्रिकेट प्रशिक्षक प्रत्येक तासामागे  शुल्क आकारत आहेत; पण, आचरेकर सरांनी शेवटपर्यंत क्रिकेट प्रशिक्षणाला व्यावसायिक रूप येऊ दिले नाही. विद्यार्थ्यांसाठी सर्वस्व देणाऱ्या आणि त्यांना क्रिकेटची गोडी लावणाऱ्या एका पर्वाची आता समाप्ती झालिये. फक्त ‘सचिन तेंडुलकरचे गुरू’ म्हणून नव्हे, तर क्रिकेटप्रती योगदानाबद्दल जग त्यांना कायम स्मरणात ठेवेल.

छायाचित्र सौजन्य : @sachin-rt

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *