ओळख भारतीय भाषांची

भारत हा विविधतेने नटलेला देश आहे याचा आपल्या सर्वांनाच अभिमान आहे. या विविधतेची प्रमुख ओळख म्हणजे भाषा! भारतीय राज्यघटनेने आपल्या देशातील तब्बल २२ भाषांना अधिकृत भाषेचा दर्जा दिला आहे आणि याशिवाय अनेक बोलीभाषा बोलल्या जातात हे देखील आहेच. काही ठराविक मैलानंतर भाषा बदलते, असे म्हणतात. भाषा बदलत असली तरी अनेक शब्द हे सर्व भाषांमध्ये एकसारखेच आहेत असे दिसते. भाषा वेगळी पण शब्द सारखे – हे कसे? या भाषांचा इतिहास काय आहे? सर्व भाषांची मुळं समान आहेत का? या प्रश्नाची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न आपण या लेखातून करणार आहोत.
Written by: Chandrasekhar G

Translated by: Onkar D

प्रत्येक प्राण्याला अन्न, झोप, स्वरक्षण आणि  पुनरुत्पादन या चार गोष्टींची काळजी असते. या सर्व प्राण्यांमध्ये मनुष्य वेगळा आहे, कारण मानवी मेंदू या चार गोष्टींच्या पलीकडे जाऊन विचार करु शकतो. हत्तीसारख्या विशाल प्राण्याच्या तुलनेत मानवी मेंदूचा आकार लहान असला, तरी याच छोट्या मेंदूने या जगातील अनेक मोठ्या गोष्टी साध्य केल्या आहेत. सुमारे ७० हजार वर्षांपूर्वी मानवी मेंदूचा विकास होण्यास सुरूवात झाली आणि त्याच काळात भाषेचा उगम झाला. याला ‘बोधन क्रांती’ असेही म्हटले जाते. नव्याने गवसलेल्या मेंदूच्या सामर्थ्याच्या जोरावर मानवी समूह ठराविक भौगोलिक प्रदेशात राहू लागला, त्या प्रदेशातील परिस्थितीचा अभ्यास करू लागला. यातून विकसित झालेले ज्ञान इतरांना देण्यासाठी त्यावेळी सांकेतिक भाषेचा उपयोग होऊ लागला. त्यानंतर शब्दांचा वापर सुरु झाला. यामधूनच भाषेची निर्मिती झाली.

सुरुवातीला या भाषेला कोणतीही लिपी नव्हती. भाषेचा विकास झाल्यानंतर भाषातज्ञांनी ती तयार केली. ‘बोधन क्रांती’च्या कालखंडामध्ये  वापरल्या जाणाऱ्या अनेक भाषा कालांतराने लोप पावल्या; त्यामुळे, कोणती भाषा सर्वात प्रथम विकसित झाली हे निश्चित सांगता येत नाही; मात्र, सध्या अस्तित्वात असलेल्या भाषांमध्ये सर्वात प्राचीन भाषा कोणती? याचा अंदाज नक्कीच लावता येऊ शकतो.

भारतीय भाषा

सध्या जगाची लोकसंख्या ७७० कोटी असून जगभरात ५ हजारपेक्षा जास्त भाषा बोलल्या जातात. भारताची लोकसंख्या १३० कोटी असून भारतामध्ये ७८० पेक्षा जास्त भाषा बोलल्या जातात. ( संदर्भ – People’s Linguistic Survey of India (PLSI), २०१०-२०१३) १९६१ साली देशभरात १६५० भाषा बोलल्या जात असत. दरवर्षी सुमारे १० भाषा लोप पावत आहेत, अशी माहिती या अभ्यासातून समोर आली आहे. हा ट्रेंड असाच सुरु राहिल्यास आणखी १०० वर्षांनंतर देशातील एकूण भाषांची संख्या ५०० पेक्षा कमी झाली तर आश्चर्य वाटायला नको! भारतीय राज्यघटनेच्या आठव्या परिशिष्टानुसार २२ भाषांना अधिकृत भाषांचा दर्जा देण्यात आला आहे. त्या भाषा पुढीलप्रमाणे १) अासामी २) बंगाली ३) बोडो ४) डोगरी ५) गुजराती ६) हिंदी ७) कन्नड ८) काश्मिरी ९) कोकणी १०) मैथिली ११) मल्याळम १२) मणिपुरी १३) मराठी १४) नेपाळी १५) ओडिया १६) पंजाबी १७) संस्कृत १८) संथाली १९) सिंधी २०) तामिळ २१) तेलुगु २२) उर्दू

भारतीय भाषांची ढोबळपणे चार प्रकारांमध्ये विभागणी केली जाते. १) इंडो-आर्यन भाषासमूह २) द्रविडी भाषासमूह ३) अॅस्ट्रो-आशियाई भाषासमूह ४) तिबेटी-ब्रह्मी भाषासमूह. या चार भाषासमूहाच्या आधारे बहुतेक भारतीय भाषांचा अभ्यास करणे शक्य आहे.

इंडो-आर्यन भाषासमूह

हा भाषासमूह जगातील सर्वात मोठ्या अशा इंडो-युरोपियन भाषासमूहाचा भाग आहे. संस्कृत ही या कुटुंबातील पहिली भाषा आणि ‘ऋग्वेद’ हा या भाषेतील पहिला ग्रंथ! ऋग्वेद हा जगातील आद्य ग्रंथ आहे, अशी आजही अनेकांची समजूत आहे. अर्थात या समजुतीला अनेक अभ्यासकांनी आव्हान दिले आहे. वैदिक कालखंडात (इ.स. पूर्व १५०० ते इ.स. पूर्व १०००)  संस्कृत भाषेचा वापर प्रामुख्याने धार्मिक विधी करताना होत असे. त्यानंतरच्या काळात ( इ.स. पूर्व १००० ते इ.स. पूर्व ६००) संस्कृत भाषेचा विकास झाला. त्या संस्कृत भाषेला ‘शास्त्रीय संस्कृत’ असे म्हणतात. याच काळात संस्कृतमध्ये अनेक गद्य रचनांचा समावेश झाला. पाली, प्राकृत आणि अपभ्रंश या तीन भाषांचा याच कालखंडात जन्म झाला. पाली : इ.स. पूर्व ५६३ ते इ.स. पूर्व ४८३ या काळात या भाषेचा वापर प्रामुख्याने होत असे. बुद्धाने आपल्या शिष्यांना ही भाषा शिकवली.

प्राकृत : इ.स. पूर्व ६०० ते १००० – या भाषेचा जन्म ‘शास्त्रीय संस्कृत’ भाषेतून झाला. अनेक बौद्ध आणि जैन पुस्तकांमध्ये ही भाषा आढळते.

अपभ्रंश – प्राकृत भाषेतून या भाषेचा जन्म झाला. या भाषेतील साहित्य प्राकृत भाषेतील साहित्यापेक्षा वेगळे असल्याने या भाषेला अपभ्रंश असे म्हंटले जाते.

अाधुनिक भाषा – अपभ्रंशामधून अाधुनिक भाषांचा जन्म झाला. यामधील मुख्य भाषा म्हणजे १) हिंदी २) उर्दू ३) बंगाली ४) पंजाबी ५) असामिया ६) गुजराती ७) ओरिया ८) मराठी ९) काश्मिरी १०) कोकणी ११) नेपाळी १२ ) सिंधी आणि अन्य  

हिंदी – भारतातील सुमारे ६५ कोटी नागरिक हिंदी भाषा बोलतात. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हरयाणा, हिमाचल प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश, बिहार, झारखंड आणि छत्तीसगड या राज्यांमध्ये प्रामुख्याने हिंदी भाषिक एकवटले आहेत. हिंदी भाषेच्या लहेज्याचा विचार केल्यास तिचे दोन उपविभाग पडतात. राजस्थानी, ब्रज, बुंदेली, माळवी, भोजपुरी आणि मेवाडी या हिंदीच्या उपभाषा आहेत. भारतामधील सर्वाधिक लोकसंख्या हिंदी भाषिक आहे आणि त्यामुळेच हिंदी ही देशाची एकमेव राष्ट्रीय भाषा असल्याची अनेकांची समजूत आहे. मात्र, ही समजूत साफ चूक आहे! राज्यघटनेने अधिकृत भाषेचा दर्जा दिलेल्या सर्वच्या सर्व २२ भाषा या आपल्या राष्ट्रभाषा आहेत.

उर्दू – देशातील वेगवेगळ्या भागांमध्ये विभागले गेलेले ११ कोटी नागरिक उर्दूभाषिक आहेत. सैनिकांच्या छावण्या, दुकाने, बाजार तसेच अल्लाउद्दीन खल्जीचे दक्षिण भारतामधील आक्रमण यामधून उर्दू विकसित झाली. हैदराबाद परिसरातील उर्दूला ‘दख्खनी’ असेही म्हणतात.

बंगाली – पश्चिम बंगाल आणि बांगला देशमधील सुमारे ३० कोटी नागरिकांची ही भाषा आहे. बंगालीचा उगम १००० साली झाला असे मानले जाते.

पंजाबी – ही सुमारे १० कोटी नागरिकांची भाषा आहे. ही भाषा भारत आणि पाकिस्तानातील पंजाब प्रांतामध्ये प्रामुख्याने बोलली जाते.

गुजराती – सुमारे साडेसहा कोटी नागरिक ही भाषा बोलतात.  ही गुजरात राज्याची प्रमुख भाषा आहे.

ओडिया –  ही ओडिशा राज्याची प्रमुख भाषा असून देशभरातील सुमारे चार कोटी नागरिक ओडियाभाषिक आहेत.

असामिया – सुमारे अडीच कोटी नागरिक ही भाषा बोलतात. अासामसहित ईशान्य भारतामधील अनेक भागांमध्ये असामिया प्रामुख्याने बोलली जाते.

मराठी – ही महाराष्ट्राची मुख्य भाषा असून गोव्यातही अनेक मराठी भाषिक आहेत. देशभरात सुमारे ८ कोटी मराठीभाषिक आहेत.

काश्मिरी – ही जम्मू व काश्मिरची मुख्य भाषा असून सुमारे ५० लाख नागरिक ही भाषा बोलतात.

कोकणी – ही गोव्याची मुख्य भाषा असली तरी कोकण, मंगळुरु तसेच केरळ भागातही ही भाषा बोलली जाते. सुमारे ५० लाख नागरिक कोकणीभाषिक आहेत.

नेपाळी – देशभरात विखुरलेल्या नेपाळी कुटुंबांची प्रमुख भाषा. भारतातील सुमारे १ कोटी ७० लाख नागरिक नेपाळीभाषिक आहेत.

सिंधी – फाळणीनंतर पाकिस्तानच्या सिंध प्रांतामधील अनेक नागरिक भारतामध्ये स्थलांतरित झाले. या सिंधी कुटुंबियांची भाषा सिंधी आहे. देशभरात सुमारे २ कोटी सिंधीभाषिक आहेत असा अंदाज आहे.

द्रविडी भाषासमूह

हा देशात दुसऱ्या क्रमांकावर असलेला भाषासमूह आहे. या कुटुंबात सुमारे २३ भाषा आहेत. यामध्ये १) तामिळ २) तेलुगु ३) कन्नड आणि  ४) मल्याळम या प्रमुख भाषा आहेत.

तामिळ – जगातील सर्वात प्राचीन भाषांमध्ये तामिळचा समावेश होतो. तामिळमधील काही साहित्य हे इसवी सनपूर्व काळातील आहे.  भारत, श्रीलंका, सिंगापूर आणि मलेशिया अशा चार देशांमधील सुमारे ८ कोटी नागरिक तामिळभाषिक आहेत.

तेलुगु – आंध्र आणि तेलंगणा या दोन राज्यातील सुमारे साडेआठ कोटी नागरिक तेलुगुभाषिक आहेत. सहाव्या शतकापासून तेलुगु भाषेच्या विकासाला चालना मिळाली.

कन्नड – या भाषेचा इतिहासही जवळपास तेलुगुइतकाच जुना आहे. भारतात सुमारे साडेचार कोटी कन्नड भाषिक असून कन्नड ही कर्नाटक राज्याची मुख्य भाषा आहे.

मल्याळम – १ हजार वर्षांपूर्वी तामिळ भाषेतून मल्याळम भाषेचा जन्म झाला. केरळमध्ये चार कोटी  मल्याळमभाषिक आहेत.

तामिळ – मल्याळम तसेच तेलुगु- कन्नड या भाषेतील लिपीमध्ये काही समान शब्द आढळतात.

अॉस्ट्रो-आशियाई भाषासमूह

संथाळी, मुंडारी, हू, स्वरा, कोर्क, ज्वांग, खासी आणि निकोबारी या प्रमुख भाषांचा या कुटुंबात समावेश होतो.

तिबेटो- ब्रह्मी भाषासमूह

बोडो, मणिपुरी, लुशाई, गारो, भूतिमा, नेवारी, लेपचा, अस्माका आणि मिकीर या प्रमुख भाषा या कुटुंबाच्या सदस्य आहेत.

जाता- जाता

इंडो – आर्यन भाषा कुटुंबातील बहुतेक भाषांची मुळं ही संस्कृत भाषेत आहेत; असे असले तरी, संस्कृतभाषिकांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. सध्या देशात केवळ १५ हजार संस्कृतभाषिक आहेत असा अंदाज आहे. केवळ धार्मिक प्रथांमध्येच संस्कृत भाषेचा प्रामुख्याने वापर होतो आहे. हा पाहता केवळ भारतातीलच नव्हे, तर जगातील सर्वात प्राचीन अशा संस्कृत भाषेचे जतन करणे हे येणाऱ्या काळात सर्वांसमोरचे  मोठे आव्हान असणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *