आपले १० वर्षांपूर्वीचे आणि सध्याचे फोटो समाज माध्यमांवर टाकण्याची गमतीशीर टूम मध्यंतरी आली हाेती. नजीकच्या भूतकाळात म्हणजे गेल्या १० -१५ वर्षांत आपल्यात झालेले देहीक बदल अशा दोन छायाचित्रांतून चट्कन दृष्टीस पडले. पण याच काळात आपल्या दैनंदिन वापरातील तंत्रज्ञानात आणि त्याअनुषंगाने सवयी, आचार-विचार आणि शिष्टाचारांमध्येही किती अलगद बदल होत गेले ना! अगदी लहान – सहान गोष्टींमध्येही हे बदल इतके मांजराच्या पावलांनी आले की, बदलणाऱ्यांनाही त्याची जाणीव झाली नाही. ही जुनी छायाचित्रं पाहाताना झालं, तसंच काहीस या विनासायास झालेल्या बदलांकडे पाहूनही चकीत व्हायला होतं.
आता हेच पाहा ना, मित्राच्या किंवा नातेवाईकाच्या घराखाली उभं राहून, जोरदार बोंब मारून त्याला खाली बोलावणं किंवा आपण आल्याची वर्दी देणं, हे प्रत्येकाच्या हाती मोबाइल आल्यापासून किंवा कॉल स्वस्त झाल्यापासून, अचानक अशिष्टपणाचं होऊन बसलयं. आता घराखाली उभं राहून फोन लावला जातो आणि खिडकीतून हात दाखवत फोनवरून निरोपानिरोपी होते.
अहो, कालपर्यंत मध्यमवर्गीय वस्तीमध्ये पुरुषांची हजामत करणाऱ्या दुकानांबाहेर बायामाणसं सहसा उभी राहात नसतं. इतकंच काय घरातल्या लहान मुलाला भादरायलासुद्धा बाबा घेऊन जात असतं. बायकांनी तिथे जाणं निषिद्ध वगैरे नव्हतं, पण सहसा तिथे बाईमाणूस फिरकत नसे. कॉलेजात असताना माझ्या एका मैत्रिणीला मी सलूनमध्ये दाढी करवून घेतो, दोन मिनिटं बाहेर बस म्हणालेलो तर ती किती वैतागली होती. आता अगदी झाकपाक सोडा, पण अनेक छोटेखानी ‘केशकर्तनालयां’मध्येही महिला-पुरुषांची परस्परांकडून सामाईक हमाजत किंवा चंपी चाललेली पाहायला मिळते. म्हटलं तर केव्हढा बदल आहे नाई हा!
यावरूनच आणखी एक आठवलं,१०-१२ वर्षांपूर्वी खांद्यांवर मैत्रिणीच्या ‘ब्रा’चे पट्टे दिसतायंत हे खुणेने सांगणं, हे एका चांगल्या मित्राचं लक्षण असे. ही अत्यंत खासगी गोष्ट मानली जायची, त्यामुळे ‘जवळ’चे हा विशेष दर्जा असणाऱ्या मित्रांनाच हे सांगण्याची परवानगी असायची. उर्वरित मंडळीसाठी असं काही दिसणं हीसुद्धा भारीच सेक्सी वगैरे गोष्ट असायची. काळ झरकन बदलला, फॅशनही बदलली; आज असे पट्टे गळ्यात घालण्याची किंवा पारदर्शक पट्टे हेतुपुरस्सर दाखविण्याची टूम आहे आणि ती इतक्या बेमालुमपणे स्वीकारलीही गेली की, पाहणाऱ्यांनाही हल्ली त्यात काही विशेष वाटत नाही.
असाच एक वाहतुकीचा शिष्टाचार हल्ली हल्लीपर्यंत होता, काही प्रमाणात आहेही; तो म्हणजे दिवसा कुणाच्या दुचाकीचे दिवे सुरू दिसले की, चित्रविचित्र खाणाखुणा करून भरप्रवासात ते बंद करायला सुचविणे. आपण कुणाचे तरी अनावश्यक सुरू असलेले दिवे मालवायला लावल्यामुळे झालेल्या ऊर्जाबचतीचं केव्हढ अप्रुप असायचं सांगणाऱ्याच्या चेहऱ्यावर. पण आता केंद्राने नवा नियम आणला, त्यामुळे सर्व नव्या दुचाकींचे दिवे दिवस-रात्र सुरूच राहतात. किंबहुना या होतकरू समाजसेवकांची कळकळ लक्षात न घेता दिवे बंद करण्याची कळच कंपनीने दुचाकीवरून काढून टाकलेली आहे. त्यामुळे बिचाऱ्यांचा अगदीच हिरमोड झालाय.
महिन्याकाठी नगदी मिळणारे वेतन धनादेशाच्या स्वरूपात मिळू लागले. इथवर ठीक होतं ओ! पण ते थेट बँक खात्यात जमा होऊन त्याचा संदेशच काय तो मोबाइलवर येऊ लागल्यामुळे मातृभक्त, कुटुंबवत्सलांची मोठी पंचाईत होऊन बसलीए! म्हणजे आधी कसं आई किंवा घरातल्या कर्त्या बाईच्या हातात पगाराचा धनादेश दिला आणि त्यांनी तो देवापुढे ठेवला की महिनाभराच्या श्रमाच सार्थक झाल्यासारखं वाटायचं. आज ती सोय राहिलेली नाही. हल्ली पगार झाल्याचं आपल्या आधी त्या ‘ईएमआय’वाल्यांना कळतं. पगार झाल्याचे आणि तो कापून गेल्याचे संदेश एकाच वेळी वाजतात. त्यामुळे पूर्वी महिनाअखेरीला टाके पडायचे; आता तर मासारंभापासूनच शिवायला सुरुवात करावी लागते.
मित्र किंवा विशेषत: लाडक्या मैत्रिणीच्या आधी चित्रपटगृहाजवळ पोहोचून तिकीट काढून ठेवणं, शो हाऊसफुल होणार असेल, तर आदल्या दिवशीच तिथे खेप घालून तिकीट मिळवणं. रेल्वे तिकिटांच्या रांगेत एखाद्या देखण्या प्रवाशांच्या तिकिटाची जबाबदारी घेणं, दूरगावची तिकीट मिळवण्यासाठी रात्र खिडकीबाहेर बारदणावर झोपून काढणं, अशा अनेक गोष्टी नव्या तंत्रज्ञानामुळे हल्लीच्या हल्ली कालबाह्य झाल्या. ऑर्कुटवर आपली खरी छायाचित्र आणि याहू चॅट रुमवर आपलं खरं नाव लपविण्याचेही दिवस गेले. आपण नकळत सोशल मीडियाला इतके सोकावलो की, छायाचित्रच काय आपल्या आयुष्यातली प्रत्येक बारीक सारीक गोष्ट आपण इथे शेअर करू लागलो. हे चांगलं की वाईट, चूक की बरोबर हे माहीत नाही. पण झटपट बदल होतायंत, ते हे असे.
हेच पाहा ना, फोनच होते तोवर आपण दूरच्या मित्रांना कोणत्याही शुभेच्छा फोनवरून द्यायचो. मात्र विशेष असणाऱ्या व्यक्तीला हाती लिहिलेलं पत्र पाठवणं भावनिक ओलाव्याच असायचं, आज आपण ‘एक मित्र’ गटात असणाऱ्यांना व्हॉट्सअप किंवा फेसबुकवरून शुभेच्छा देतो आणि खास असणाऱ्यांना फोन करून. म्हणजे फोनवरून शुभेच्छा हा पूर्वीचा ‘दिवाणे आम’साठीचा प्रकार ‘दिवाणे खास’साठी उरलाय.
एकंदरीत काय आपली इच्छा असो वा नसो, आपण कालपेक्षा आज वेगळे असतो आणि आजपेक्षा उद्या. हे बदल दिसण्याबाबत जितके खरे, तितकेच जगण्या- वागण्याच्या, नीती-अनीतीच्या, समाज – व्यवस्थेच्या प्रत्येकच पैलूंचाबाबतीतही!
January 22, 2020 — magnon