बदलांची भाषा आणि भाषेतील बदल

Written by: SANKET SATOPE

भाषा हे माणसाचे व्यक्त होण्याचे आदिम साधन आहे. अगदी अश्मयुगातला माणूसही त्याच्या दैनंदिन व्यवहारांसाठी कोणती ना कोणती भाषा वापरतच असला पाहिजे. मग ती भाषा शब्दांची असेल, हावभावांची किंवा ठराविक स्वरांची; पण भाषा असणार नक्की. अंदमानसारख्या बेटांवर आजही आदिम अवस्थेत जगणाऱ्या जरावासारख्या वनवासी जमातींचीही स्वत:ची भाषा आहे, संवादाची तऱ्हा आहे. भाषा हे प्रामुख्याने बोलण्याचे आणि ऐकण्याचेच साधन आहे. लिहिणे- वाचणे हा उपचार त्यात फार उशिरा आला. लिखित स्वरूप प्राप्त होताच, त्याचे प्रमाणिकरण होऊ लागले. काय योग्य, काय अयोग्य, याचे शास्त्र तयार झाले आणि बोललेले अधिक काळ स्मरणात ठेवण्यासाठी लिहून ठेवणे, हा लिखाणाचा मूळ उद्देश बाजूला पडून; लिहिल्याप्रमाणे बोलणे, असा उलट प्रवास सुरू झाला. हा प्रवास प्रवाहीपणास खीळ घालणारा आणि म्हणूनच कोणत्याही भाषेच्या जिवंतपणास मारक ठरणारा आहे. कारण प्रवाहीपणा हेच जिवंतपणाचे लक्षण आहे. प्रत्येक जिवंत गोष्ट ही प्रवाही असतेच. मग भाषा त्याला अपवाद कशी ठरेल. सध्या मराठीत आणि सर्वच भारतीय भाषांमध्ये होणाऱ्या स्थित्यंतरांबाबत आरडाओरड करताना, ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे.

   ‘आमच्या वेळी अशी भाषा नव्हती, शी काय आजची भाषा,’ अशा तुकड्यानेच बोलणे सुरू करणारी मंडळी ते आदर्श म्हणून सांगत असलेल्या कालखंडातही भाषेबाबत असाच ओरडा होत होता, नव्हे तो प्रत्येकच काळात होत राहिला आहे, हे विसरतात. कालच्यापेक्षा आजची आणि आजच्यापेक्षा उद्याची भाषा वेगळी असणारच, कुणीही कितीही आटापीटा केला, तरीही हे बदल अटळ आहेत आणि ते नाकारणारी भाषा मृतप्राय होते किंवा बाजूला पडते. त्यामुळे सध्या सर्वच क्षेत्रांत झपाट्याने होणारे बदल जी भाषा अंगिकारेल किंवा ते बदल सामावून घेण्यासाठी सक्षम होईल, तीच भाषा टिकेल, तगेल आणि वृद्धिंगत होईल, हे वास्तव आहे.

   इथे एक गोष्ट मात्र कायम ध्यानात ठेवली पाहिजे की, बदल समावून घेणे, स्वीकारणे आणि बदलांत वाहून जाणे, या दोन अतिशय भिन्न गोष्टी आहेत. देशी भाषांच्या संवर्धनासाठी झटणारे कार्यकर्ते, भाषाप्रेमी आणि नको तितके आधुनिक झालेले भाषिक स्वैराचारी यांच्यात खटका उडतो, तो याच गोष्टीवरून. भाषाप्रेमी बदल स्वीकारणे आणि स्वैराचारी त्यात वाहून जाणारे. ‘एक तुतारी द्या मज आणूनि’ म्हणणारे आधुनिक मराठी काव्याचे जनक केशवसूत यांनी बदल स्वीकारले म्हणूनच ते सुनीते मराठीत आणू शकले, शिरवाडकरांनी बदल स्वीकारले म्हणून नटसम्राट मराठीत आले, विंदांनी बदल स्वीकारले म्हणून ते तुकोबांच्या भेटीला शेक्सपिअरला आणू शकले. गझलकार सुरेश भट, हायकुकार शिरीष पै, यातल्या कुणावरही मराठीची वाट लावल्याचा आरोप करता येईल का? उलट मराठी संपन्न केल्याबद्दल त्यांचे आजवर कौतुकच होत आले. याचे कारण त्यांनी परभाषेतील साहित्य मराठीत आणले, नवे बदल स्वीकारले, नवे साहित्य प्रकारही स्वीकारले, पण हे सर्व करतानाच मराठीचा लहेजाही सांभाळला. आज मात्र बदल स्वीकारणे याचा अर्थ परभाषेतील संज्ञा, शब्द, विचार, तत्त्व स्वभाषेत जसेच्या घुसडणे असा झाला आहे. सरमिसळ ही दुधात साखरेसारखी हवी, त्याने दुधाचा गोडवाही वाढावा आणि त्यांनी दुधाशी समरसून जावे. सध्या दुधात लिंबू पिळण्याचे प्रकार सुरू असलेले बऱ्याचदा दिसते. त्याने दुधाचे गुणवर्धन न होता ते नासण्याचेच काय ते काम होऊ शकते. सध्याची मराठी चित्रपट, नाटकांची नाव पाहिली, तरीही या प्रकाराचे गांभीर्य लक्षात येईल. ‘दिल अभी भरा नही’, ‘जादू तेरी नजर’, ‘चॅलेंज’ या नाटकांच्या शीर्षकांनाही हिंदी- इंग्रजीच्या आधार का घ्यावासा वाटावा? असे काय वेगळेपण आहे, या शीर्षकांमध्ये जे मराठी नावांतून दाखविता आले नसते. ‘दिसून येते, आढळून आले, माहिती पुढे आली’ ही थेट इंग्रजी शैलीची क्रियापदे वापरण्याची पद्धत सर्वच मराठी वृत्तपत्रांमध्ये रुढ झालेली दिसते. त्याऐवजी ‘दिसते, आढळते, कळते, निष्पन्न होते’ अशी थेट मराठमोळी रचना का करण्यात येत नाही, हे अनाकलनीय आहे. ‘अमके  – तमके असे म्हणाले की,’ अशी वाक्याची सुरुवात करण्याची हिंदी पद्धत मराठीला किती शोभते? त्याऐवजी वक्त्याचे म्हणणे सांगून शेवटी ‘अमके-अमके म्हणाले’ असे लिहिणे अधिक उत्तम वाटत नाही का? वाहिन्यांवर तर मराठीच्या चिंध्या उडताना दिसतात. ‘जसं की आपण पाहू शकता, तसं’, ‘जसं की ते म्हणाले तसं’ या हिंदीभ्रंशीत गोलगोल फिरणाऱ्या वाक्यरचनेऐवजी ‘आपल्याला दिसतयं ते’, ‘आपण म्हणतायं त्यानुसार’ ही थेट मराठी शैली किती सोपी आणि सुटसुटीत आहे.

        आता या बदलांना भाषा प्रवाही असते, तिच्यात स्थित्यंतर येणारच या नावाखाली सूट देता, येऊ शकते का? आणि तशी ती दिली गेली, तर नव्या पिढीपर्यंत जाणारी भाषा ही मराठीच असेल, याची काही खात्री देता येईल का? की हिंदीवरील अरबी – फारसीच्या प्रभावामुळे तयार झालेल्या उत्तरेतील हिंदुस्थानी अथवा उर्दू या ढेडगुजऱ्या भाषेसारखे मराठीचे स्वरूप होईल? याचा विचार प्रत्येकानेच करायला हवा. आपण आपला सर्वाधिक वेळ ‘ल आणि ळ’ किंवा ‘न आणि ण’चे उच्चार योग्य – अयोग्य करणाऱ्यांना गोंजारण्यात वा फटकारण्यात घालवतो. वस्तुत: या वर्णांचे दोन्ही उच्चार मराठमोळेच आहे. त्यामुळे ते बरोबर- चूक आल्याने फार काही आभाळ कोसळत नाही. ‘ण’चा उच्चार न करू शकणाऱ्या किंवा तो (‘णमण’ वगैरे) चुकीच्या ठिकाणी उच्चारणाऱ्यांना हसणारी मंडळी ‘प्रश्ण’ हा उच्चार मात्र सहज करून जातात आणि आपण चुकलोय हे त्यांच्या गावीच नसते. ‘ळ’चीसुद्धा तीच कथा ‘ळ’ हे वर्ण मुळात बोली मराठीतले किंवा प्राकृतातले संस्कृतात ते नाही. त्यामुळे हे वर्ण वापरून ‘जे खळांची व्यंकटी सांडो’ असे म्हणताना; ‘खल’, हा संस्कृत शब्द सर्वसामान्यांच्या भाषेप्रमाणे ‘खळ’ असा वापरणाऱ्या ज्ञानदेवांना तत्कालीन कथित पंडितांनी बहिष्कृत ठरवले होते. आज मात्र याच ‘ळ’चा उच्चार करता येणाऱ्यांना भाषिक प्रतिष्ठा मिळते आणि ‘ल’ म्हणणारे गावरान ठरतात. असो, पण हे वाद चालतच राहणार. ‘वादवादे जायते तत्वबोध’ हे आपल्या संस्कृतीचे सूत्रच असल्यामुळे असे वाद हवेतच. त्याविना भाषेचा विकास व्हायचा नाही. मुद्दा हा आहे की, या वादात पटापट आणि निकराने उड्या घेणाऱ्या मंडळींच्या नाकाखालून मराठीला विक्षिप्त आणि विकृत वळण लागत आहे. तरीही ते प्रमाणभाषा की बोलीभाषा याच वादात अडकून पडले आहेत.

         आज जागतिकीकरणाच्या रेट्यात या भाषेतील शब्द त्या भाषेत उचलला जाणे, हे खूपच स्वाभाविक झाले आहे. पण त्यामुळे देशीभाषा केवळ क्रियापदांपुरतीच उरेल की काय, अशी भीती निर्माण होणे घातक आहे. नवे तंत्रज्ञान, नवनव्या संज्ञा, जगभरातून इतक्या झपाट्याने आपल्यापर्यंत पोहोचत आहेत की, त्यांना समर्पक देशी प्रतिशब्द पाडणे आणि ते तितक्याच वेगाचे प्रचारणे, हे मोठे आव्हानच होऊन बसले आहे. ते वृत्तपत्र, साहित्यिक, वक्ते यांनी पार पेलले नाही, तर येणाऱ्या पिढीला त्यासाठी दोषी मानता येणार नाही. मराठीतील एक-दोन निवडक वृत्तपत्रे सोडली, तर या आव्हानाची फार कुणाला जाणीवही असल्याचे जाणवत नाही. एखादी संज्ञा जागतिक पटलावर येते, तेव्हा तिला जोडून अनेक सांस्कृतिकसंदर्भही येत असतात. त्यामुळे वेळीच त्याचे देशीकरण करून घेणे आवश्यकच ठरते. तसे झाले तरच त्या संकल्पना देशात योग्यरित्या रुजतात आणि अनावश्यक सांस्कृतिक सरमिसळही थांबते. चायनीज, पिझ्झा हे पदार्थ भारतात विकले जाताना त्यात भारतीय चवींचा विचार केला जातोच, अन्यथा मूळ चवीमध्ये त्यांना भारतात टिकाव धरणेही अवघड झाले असते. तोच प्रकार भाषांच्या बाबतीतही लागू होतो.

          आजच्या भाषेला लागलेले आणखी एक वाईट वळण म्हणजे, मराठीतले सुंदर – सुंदर शब्द अत्यंत चुकीच्या पद्धतीने किंवा चुकीच्या अर्थाने वापरण्याचा जणू प्रघातच सध्या पडत चालला आहे. यामुळे उत्पत्तीशास्त्राच्या दृष्टीनेही सखोल असलेले आपल्या मराठीतील अनेक शब्द भविष्यात पांगळे होणार आहेत. घोडचूक हा सर्रास वापरला जाणारा शब्द खरंतर घोरचूक आहे, हे आपण विसरतो. ‘अठराविश्व दारिद्र्य’ ही संज्ञा तर आता इतकी रुजली आहे की, ते ‘अठराविशे दारिद्र्य’ असे आहे हे सांगूनही कुणाला पटणार नाही. हे झाले शाब्दिक बदल, आता अर्थदृष्ट्या झालेले काही विकृत बदल पाहूया. प्रभृती या शब्दाचा अर्थ आदी, इत्यादी असा आहे; परंतु आज तो चक्क महान, महनीय व्यक्ती या अर्थाने वापरला जातो. त्यामुळे ‘या वेळी व्यासपीठावर मुख्यमंत्री, राज्यपाल, सचिव, आदी प्रभृती उपस्थित होती.’ अशी वाक्य आपण आघाडीच्या वर्तमानपत्रांतून नियमित वाचतो. ‘रुजुवात’ हा शब्द हल्लीचे अनेक नवीकवी सुरुवात या अर्थाने खुशाल वापरायला लागले आहेत, अरे पण रुजुवात म्हणजे पडताळून पाहाणे, खातरजमा करणे, हे त्यांना सांगूनही पटत नाही. एखादा संस्कृताळलेला शब्द असावा, या थाटात ते हा मूळचा अरबीसंकरिक शब्द वापरून ‘माझ्या प्रेमाला रुजुवात झाली’, अशी वाक्य बेधडक लिहितात. ‘दिठी’ हा शब्दही बरेच लोक दिवा या अर्थी वापरू लागले आहेत. त्याचा अर्थ दृष्टी आहे, ते जाणूनही घेतले जात नाही. असे शब्द शेकड्याने निघतील. चुकीच्या अर्थाने किंवा भलत्याच अर्थाने शब्द लिहिले जाण्याचे प्रकार पूर्वीही होत होतेच. फरक फक्त इतकाच होता की, अशा लोकांना पूर्वी प्रतिष्ठा मिळत नव्हती. आज चोखंदळ वाचकांची संख्या घटत असल्याने ती मिळू लागली आहे. हे कोणत्याही भाषेच्या भवितव्यासाठी चांगले लक्षण नाही.

         आजच्या ‘ऑनलाइन’ काळात चिन्हांची एक नवी भाषा मोठ्या प्रमाणावर वापरली जात आहे. बरं, ठीक आहे, यांसारखे उद्गार तर एक ठेंगा दाखवून, व्यक्त केले जातात. शब्दांपलिकडे जाऊन, जगभरात कुठेही कळणारी ही चित्रांची आणि चिन्हांची भाषा नक्कीच स्वागतार्ह आहे. पण त्याला मर्यादा आहेत, हेही तितकेच खरे. सध्या आपण समाजमाध्यमांवर संवादासाठी वापरतो ती चिन्हे, काही अपवाद वगळता आपल्या भाषेला पूरक म्हणून वापरतो. म्हणजे, ‘मी छान आहे’ असे म्हटल्यानंतर एखादी हास्यमुद्रा किंवा शुभेच्छा दिल्यानंतर ठेंगा. या चिन्हांच्या पूरक भाषेने दूरस्थ संवादांमध्ये मसालेदारपणा आणि प्रभावीपणा वाढवला आहे, हे मानायला प्रत्यवाय नाही. नवप्रेमीयुगुले या म्हणण्याशी विशेष सहमत होतील.

      समाज माध्यमे या प्रकारामुळे रुढ माध्यमांवरील प्रस्थापितांची मक्तेदारी मोडीत काढून, प्रत्येकालाच स्वत:चे मत मांडण्याची, व्यक्त होण्याची संधी मिळू लागली आहे. भाषिकदृष्ट्या या संधीचा विचार करता, त्याचे फायदे आहेत तसे काही तोटेही आहेत. कालपर्यंत कोणत्याही साहित्यावर प्रकाशनपूर्व संपादनाचा संस्कार होत असे. त्यामुळे भाषेतील आणि एकंदरच साहित्यातील त्रुटी प्रकाशनापूर्वीच दूर होत असत. पण आज विचार काय किंवा साहित्य काय थेट वाचकांपर्यंत पोहोचते. परिणामी ते बऱ्याचदा अपरिपक्व किंवा कच्च्या स्वरूपाचे असते. भाषाही बाळबोध असते. अशा वेळी नीर-क्षीर विवेक बाळगणारा चोखंदळ वाचक अधिक महत्त्वाचा ठरतो. तो आपल्या जवळपास नसला, तर गल्लीबोळात साहित्यिक आणि विचारवंताची पिके निघायला लागतात. अशा सुमारांची सद्दी आपण फेसबुक आणि ब्लॉगवर झालेली पाहातोच.

          दरम्यान, गेल्या काही वर्षांत समाज माध्यमांतसुद्धा अनेक स्थित्यंतरे येताना आपण पाहत आहोत. सुरुवातीला ऑर्कूटसारख्या संकेतस्थळांवर किंवा नव्याने आलेल्या ब्लॉगरवर भारंभार लिखाण करण्यावर लोकांचा भर होता. मोठी जागा आहे, त्यामुळे वाट्टेल ते आणि वाट्टेल तितके लिहा, अशी सुरुवातीची धारणा होती. अगदी वृत्तपत्रांच्या संकेतस्थळांवरही कितीही मोठा लेख येऊ द्या, असे लेखकांना सांगितले जात होते. मात्र आता तेथील भाषेलाही हळूहळू वळण लागत आहे. नियमित ब्लॉग लेखक, त्यांची शैली, त्यांची भाषा आणि त्यांचे चाहते तयार होत आहेत. त्यामुळे जागा कितीही असली, तरीही अमुक एका मर्यादेपलिकडे नेटवर वाचले जात नाही, हे लक्षात घेऊन लिखाण केले जात आहे. भाऊ तोरसेकरांसारखे पत्रकारांनीही ब्लॉगच्या माध्यमातून तब्बल एक कोटी वाचकांपर्यंत पोहोचण्याची किमया साधली आहे. ‘द वायर’सारखी ऑनलाइन पोर्टल तुफान गाजत आहेत. साहजिकच ऑनलाइन माध्यमांची एक नवी भाषा आकार घेत आहे. इथे लिहिण्यासोबतच तुमच्या म्हणण्याच्या पृष्ठर्थ तुम्हाला ऑनलाइन मजकूर, चित्रफिती, छायाचित्र आदींचे दुवे देता येत असल्यामुळे वाचकांनाही विविध संदर्भ जिथल्या तिथे पडताळून पाहाता येत आहेत. त्यातच ट्विटरसारख्या माध्यमांतून तर १४० शब्दांच्या मर्यादेत आणि हॅशटॅगकरून लिहिण्याची एक नवी पद्धत विकसित झाली आहे. त्यामुळे कमीत कमी शब्दांत आपले म्हणणे मांडण्याची आणि ते समजून घेण्याची सवयच या मंडळींना लागली आहे. अर्थात ट्विटरसारखे माध्यम हे काही भाषा- साहित्य प्रसाराचे साधन नाही. ते फक्त आपले मत किंवा बातमी दुसऱ्यापर्यंत पोहोविणारे माध्यम आहे. त्यामुळे येथील लिखाणाच्या भाषिक वैशिष्ट्यांची चिकित्सा करण्याचे काही प्रयोजनच नाही. मात्र येथे एक अवश्य नमूद करता येईल, या १४० शब्दांच्या मर्यादेतसुद्धा उत्कृष्ट भाषिक नमूने ठरू शकतील, असे ट्विट करणारे काँग्रेस नेते शशी थरूर यांच्यासारखी किंवा पत्रकार अर्णव गोस्वामी यांच्यासारखी मंडळी आहेत.

        तांत्रिक कारणांमुळे काही वर्षांपूर्वी मोजक्या शब्दांत पाठवावे लागणारे तार संदेश, त्यानंतर पेजर, भ्रमणध्वनीच्या काळातील लघुसंदेशांतील शब्दमर्यादा असे सगळे टप्पे ओलांडून ईमेल आणि ब्लॉग या अमर्याद शब्दसंख्येसाठी जागा उपलब्ध करून देणाऱ्या माध्यमापर्यंत आल्यानंतर; आता माणसाला पुन्हा मर्यादित शब्द संख्येची ट्विटरची चौकट हवीहवीशी वाटू लागली, हे आश्चर्य आहे. आज आम्हाला कोणतेही बंध नकोत, स्वैराचारी जिणे हवे, मनमौजीपणा हवा, असा कांगावा करत पुढे- पुढे चाललेल्या आपल्या समाजालाही काही दशकांनी असेच पुन्हा आपणहून मर्यादांच्या चौकटी यावेसे, वाटेल का! कारण व्यवस्थेच्या मर्यादा उलंघू पाहणाऱ्या याच समाजाने कधीकाळी त्या मर्यादा निर्माणही केल्या आहेत. ही वर्तुळाकार स्थितंतरे पिढ्यानपिढ्या अशीच सुरू आहेत, सुरू राहतील; कारण काळ अमर्याद आहे, कदाचित मानवी आकांक्षांपेक्षाही..!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *