एक लोकलायझेशन एजन्सी या नात्याने आम्ही ‘मॅग्नॉन’मध्ये प्रामुख्याने तांत्रिक मजुकरावर काम करतो, जो प्रामुख्याने नॉन-फिक्शन प्रकारात मोडतो. मात्र, काही वेळेस आम्हाला एखाद्या कवितेचेही लोकलायझेशन करावे लागते. एखाद्या कवितेचे रूपांतर भारतीय भाषांमध्ये करत असताना त्या कवितेचा अर्थ, भाषासौंदर्य, उत्कटता आणि प्रवाहीपणा याला धक्का पोहचणार नाही याची काळजी ‘मॅग्नॉन’’मध्ये घेतली जाते.
कवितेचे लोकलायझेशन हा भाषांतरामधला एक सर्जनशील प्रकार आहे. यास ‘ट्रान्सक्रिएशन’ असेही म्हंटले जाते. ट्रान्सक्रिएशन करताना भाषातज्ज्ञाला नेहमीची शैली सोडून वेगळ्या पद्धतीने विचार करावा लागतो. ट्रान्सक्रिशन करताना आम्ही स्वत:ला काही प्रश्न विचारतो. ते प्रश्न पुढीलप्रमाणे :
- कवितेमध्ये कवीला नक्की काय म्हणायचं आहे? विशेषत: कवितेमध्ये एकाच शब्दाचे वेगवेगळे अर्थ निघू शकतात, एखाद्या ओळीचे अनेक पद्धतीने विश्लेषण करता येते. त्यामुळे, कवितेचा अर्थ समजण्यासाठी ती कोणत्या काळात लिहिली गेली, तिची पार्श्वभूमी काय- हे जाणून घेणे हे नेहमी उपयोगी ठरते.
- भाषेचा रोख कसा आहे? भाषा आक्रमक आहे का? भाषा उपहासात्मक आहे की सरळ? हे लोकगीत आहे की भक्तीगीत?
- या कवितेचा मुख्य वाचकवर्ग कोण आहे? गावातील अल्पशिक्षित मजूर की शहरातील उच्चशिक्षित तरुणवर्ग? मुख्य वाचकवर्गाला समजेल अशा भाषेत या कवितेचे ट्रान्सक्रिशन झाले आहे का ?
- वाचक वर्गाची संस्कृती, जीवनशैली यांच्याशी कवितेतील मजकूर निगडीत आहे की नाही? कवितेचा जो प्रकार मूळ कवितेमध्ये वापरण्यात आला आहे तो वाचकवर्गाला समजणारा आहे का? नसेल तर त्यामध्ये काय बदल केला तर तो स्थानिक वाचकवर्गाला भावेल?
- ही कविता वाचून वाचकांमध्ये काय प्रतिक्रिया उमटू शकते? वाचकांच्या संभाव्य प्रतिक्रियांचा विचार करून कवितेच्या भाषेत काही बदल करता येईल का?
या सर्व प्रश्नांच्या कसोटीवर मुख्य मजकूर तपासल्यानंतर आम्ही मूळ भाषेतील गोडवा स्थानिक भाषेत पोहचवण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे हे केवळ भाषांतराचे काम नसून एखाद्या परकीय भाषील मजकुराची प्रेरणा घेऊन मूळ मजकूर निर्माण करण्याचे काम आहे असे नक्कीच म्हणता येईल.
भाषांतरकाराने या गोष्टी लक्षात न घेता भाषांतर केले तर मूळ भाषेतील सौंदर्य लोप पावण्याचा तसेच भाषांतर रटाळ होण्याची शक्यता असते. अर्थ समजून न घेता भाषांतर केल्यास ते कधी-कधी हास्यास्पद होऊ शकते, किंवा भाषांतरकाराची फजिती होऊ शकते.
भाषांतरकारावर कवितेचे भाषांतर करण्याची वेळ नेहमीच येत नाही; मात्र, कॉपीरायटिंग, मार्केटिंगचा मजकूर, मनोरंजनपर व्हिडिओला सबटायटल देणे या सर्व कामांसाठी परिणामकारक भाषांतर करण्याची आवश्यकता असते. संस्कृती, भौगोलिक अंतर आणि अर्थातच भाषा यांच्या सीमा ओलांडून केलेले भाषांतर हे नेहमीच त्या ब्रँडच्या व्यावसायिक यशामध्ये निर्णायक ठरते.
एका भाषेतील मजकूर दुसऱ्या भाषेत योग्यरीत्या रूपांतरित झाला तरच वाचकाला मूळ भाषेच्या वाचकांइतकाच आनंद, प्रेरणा अथवा वेदना यांची अनुभूती घेता येऊ शकते.
पियूष मिश्रा ( हिंदी), ग्रेस ( मराठी), सुब्रमण्यम भारती ( तामिळ), वेमण्णा ( तेलुगु) किंवा के.एस. नारायणस्वामी (कन्नड) यांच्या साहित्याचा आनंद घेण्याचा अधिकार सर्व भाषिकांना आहे. वेगवेगळ्या मानवी छटा व्यक्त करणारे हे साहित्य सर्वदूर पोहचण्यासाठी या साहित्याचे योग्य प्रकारे भाषांतर होणे आवश्यक आहे. त्यामुळेच, आम्ही भाषांतर करताना मूळ भाषेतील सौंदर्य, मजकुरातील आत्मा यांचा विचार करतो.
तुम्ही असे एखादे भाषांतर ( चांगले किंवा वाईट ) वाचले आहे का? ते भाषांतर वाचताच अरेरे.. किंवा क्या बात है! अशी तुमची भावना झाली आहे का? असेल, तर त्याबद्दल कमेंट करून नक्की कळवा. तुमच्याकडून येणारी प्रत्येक प्रतिक्रिया ही आमच्यासाठी मोलाची आहे.
December 11, 2018 — magnon